नगर,दि.२१:- रमजान ईद व अक्षय्य तृतीया सणांच्या पार्श्वभूमीवर नगर जिह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश, अफवा पसरविल्यास संदेश पाठविणारा तसेच ग्रुप ऍडमिन या दोघांवरही कारवाई होणार आहे.
सायबर पोलिसांनी कलम 149 नुसार तशी नोटीस नगर जिह्यातील सर्व ग्रुप ऍडमिन्सना काढली आहे.
22 एप्रिल रोजी रमजान ईद व अक्षय्य तृतीया हे सण साजरे होणार आहेत. हे सण शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱयांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजांत तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.