पुणे,दि.१८:-गोव्यातून बिअरआणि विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने कारवाई करून ट्रकचालकाला अटक केली. या कारवाईत 65 लाख,90 हजार,160 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. मावळ तालुक्यातील सोमाटणे पाठकर नायकजवळ ही कारवाई करण्यात आली. शंकरलाल नारायण जोशी (46, रा. बस्सी, जिल्हा उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्यासह ओमपुरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोव्यात उत्पादन करण्यात आलेली आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी परवाना नसलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोमाटणे गावच्या परिसरात सापळा रचला. त्यावेळी एका कंटेनर ट्रकला संशयावरून पथकाने अडवले. ट्रकची तपासणी केली असता गोव्यातून दारूची तस्करी होत असल्याचे समोर आले. विविध ब्रँडची विदेशी दारू आणि बिअरचे एकूण 845 बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण 65,90,160 रुपये किमतीची विविध प्रकारची विदेशी दारू व बिअर तयार करून विक्रीसाठी जप्त करण्यात आली. दारू आणि वाहनासह 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडेचे निरीक्षक संजय सराफ, उपनिरीक्षक दीपक सुपे, प्रियांका राठोड, सहायक उपनिरीक्षक सागर धुर्वे, आर.सी.लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जवान तात्याबा शिंदे, राहुल जंजाळ, संजय गोरे यांनी ही कारवाई केली.