पुणे,दि.१५:- गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचेकडून सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक देण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ ते २०२१ पर्यंत एकुण ४३ पोलीस अधिकारी यांना सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्य स्तरावरून केंद्र शासनास पात्र पोलीस अधिकारी यांच्या शिफारसी पाठविताना पोलीस महासंचालक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम) गु. अ.वि., पुणे मा. विशेष पोलीस
महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.) गु.अ.वि., पुणे यांची समिती गठित करण्यात आली आहे. निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामधून प्राप्त झालेल्या शिफारसी अहवालांची निकषांनुसार पडताळणी होवुन एकुण २२ पोलीस अधिकारी यांचे शिफारसी अहवाल केंद्रीय गृहमंत्रालय येथे पाठविण्यात येतात. त्यापैकी राज्यातून दरवर्षी ११ पोलीस अधिकारी यांची निवड केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी करण्यात येते.सन २०१८ ते २०२१ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान समारंभ आज दि.१५ रोजी पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र, येथे रजनिश सेट, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमामध्ये एकुण ४३ पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचे पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
पुरस्कारपात्र पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्हे, पोक्सो अंतर्गत गुन्हे, मतिमंद व मुकबधिर मुलींचे लैंगिक शोषण यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आधुनिक तपास पध्दतीचा अवलंब करुन उघडकीस आणले आहेत. पोलीस महासंचालक यांनी पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.समारंभास प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, रितेशकुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, सुरेश कुमार मेकला, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम), सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.) दिनेश बारी, पोलीस अधीक्षक (कायदा व संशोधन) गु. अ. वि. पुणे याशिवाय इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, निमंत्रक असे उपस्थित होते.