मुंबई, दि. ०८ :- नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरं व्हावं, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात 500 कोटींची घोषणा करण्यात आली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.