पुणे दि.०४: – छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी या परिसरातील विविध औद्योगिक आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या आदी ठिकाणी सोमवार ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ मतदार नोंदणीचे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम भोर विधानसभा मतदार संघातील भोर, वेल्हा व मुळशी या तालुक्यांतील सर्व ५६१ मतदान यादी भागांमध्ये सुरु आहे. विद्यार्थी, दिव्यांग महिला घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्ती तृतीयपंथी व्यक्ती, देह विक्री करणाऱ्या महिला आदी गटांतील व्यक्तींची मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार भोर मतदार संघातील औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची कामाच्याच ठिकाणी मतदार नावनोंदणी या शिबिरात करण्यात येणार आहे.
भोर विधानसभा मतदार संघातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ, स्वच्छक, सुरक्षा कर्मचारी आदींनी आपल्या कंपनीत उपस्थित राहणाऱ्या नोडल अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मतदार यादीमध्ये आपली नावनोंदणी करून घ्यावी. आपल्या नावाची नोंदणी यापूर्वीच झालेली असेल तर आपल्या मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन २०३ भोर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मुळशी अभय चव्हाण यांनी केले आहे.