पुणे,दि.२२:-आपली सर्वांची दोन वर्षे कोरोना महामारीमुळे अतिशय वेदनादायक गेली आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अश्यावेळी आपल्या सभासदांसाठी अत्यावश्यक सामानाचे किट व आर्थिक मदत महामंडळाने करून त्यांना हातभार लावला आहे.
याच कलावंत सभासदांचा विचार सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते मा. विक्रमजी गोखले यांनी केला. कलावंतांच्या उतारवयात व उत्तर आयुष्यात त्यांना हक्काचे ठिकाण असावे ही गरज त्यांच्या लक्षात आली. त्यांची ही योजना कोण पुढे नेऊ शकेल असे ज्यावेळी त्यांना प्रश्न पडला तेव्हा त्यांच्या समोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पर्याय दिसला, त्यांनी कामाची पद्धत पहिली होतीच, मोठ्या विश्वासाने त्यांनी ही जबाबदारी चित्रपट महामंडळावर सोपविली.
नुसता विचार न मांडता त्यानी सर्वप्रथम यामध्ये स्वतःचे योगदान देण्याचा विचार केला, यासाठी त्यांनी स्वमालकीची जागा देऊ केली, यासाठी त्यांनी आपले भाचे यशवंत गायकवाड यांनाही जागा देण्यास प्रवृत्त केले. दोघांनी मिळून दोन एकर जागा महामंडळाला दान दिली आहे. आजच्या रेटने या जागेचे बाजारमूल्य है रू.५ कोटीपेक्षा अधिक आहे.
विक्रम गोखले व श्री यशवंत गायकवाड यांच्या औदार्याची माहिती करून देणे व या जागेचा वापर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे कलावंतासाठी वृद्धाश्रम शुरु करण्यासाठी व कलावंतांची कला सादर साकारण्यासाठी खुला रंगमंच तयार करून वापरणार आहे.ही जागा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नाणे गावं येथे आहे.
नुकताच या जागेचा व्यवहार उपनिबंधक कार्यालयात रजिस्टर करून संपन्न झाला आहे. ती कागदपत्रे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना सुपूर्त करण्यात आली.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध वात्रटिकाकार निर्माते व दिग्दर्शक रामदासजी फुटाणे, सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे , मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते रमेश परदेशी, सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा, निर्माते श्री वैभव जोशी, निर्मिती प्रमुख अनिल उर्फ अण्णा गुंजाळ हे उपस्थित होते. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सर्वाचे स्वागत केले. उपस्थितांमार्फत मा. विक्रमजी गोखले व मा. यशवंत गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.