पुणे,दि.०९: राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील
एकल महिलांसाठी समाधान शिबिरे, मालमत्ता नावावर करण्यासाठी विशेष मोहीम, तालुकानिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. या माध्यमातून महिलांची नावे त्यांच्या जमिनी आणि मालमत्तामध्ये सातबारावर नोंद करता येतील, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापतीडॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
पुण्यातील अफार्म आणि मकाम या सामाजिक संस्थांतर्फे आयोजित ‘महिला शेतकरी समस्या आणि उपाय योजना’ या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्राच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या.
नाशिक, जळगाव, पालघर, जालना, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर अशा विविध जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांशी डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, शेतकरी एकल महिलांना मोफत बी बियाणे, खते देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्हाधिकारी विमला यांच्याशी विदर्भातील महिलांनी संपर्क साधावा. एकल महिलांच्या गरजू मुलांसाठी शिर्डी संस्थान तसेच समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात व्यवस्था करता येऊ शकते. याकरिता महिला आणि मुलांची जिल्हानिहाय यादी सादर करावी. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात दर सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने या यादीचा पाठपुरावा करता येईल. येत्या तीन महिन्यांत किमान दोनशे ते तीनशे एकल महिलांचे नाव त्यांच्या संपत्तीच्या मध्ये सातबारावर आले पाहिजे असे प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले.
नुकत्याच तुकडेबंदीबाबत आलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार नावावर जमिनी होण्यासाठी आता सुलभ प्रक्रिया करता येईल. त्या – त्या जिल्ह्यांच्या निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून महिलांना योग्य ती माहिती संस्थांनी मिळवून द्यावी असे आवाहन त्यांनी सामाजिक संस्थांना केले.
महिलांचा समावेश वन संवर्धनात यावा याबाबतचा अध्यादेश माहितीसाठी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर लवकरच मराठवाडा विभागांमध्ये बैठका घेणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
कार्यक्रमात अफार्मचे सुभाष तांबोळी,सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, शुभदा देशमुख आणि अनेक जिल्ह्यातील महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.