पिंपरी,दि २४:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातील गट अ ते गट ड मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासन सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. ही माहिती सादर करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रशासनातील गट अ, ब, क आणि ड या चार गटातील जे अधिकारी आणि कर्मचारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन वर्षाची सेवा कालमर्यादा पूर्ण करतात. अशांची बदली करण्याचे आदेश काढले जाणार आहेत. प्रत्येक विभागांमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले असंख्य अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरत आहेत. त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाने विभाग प्रमुखांना दिले आहेत. 31 जानेवारी अखेर ही माहिती सादर करावी लागणार आहे. तथापि, ज्या अधिकारी आणि कर्मचा-यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली करायची असेल त्यांनी सुध्दा 31 जानेवारीच्या आत अर्ज सादर करावयाचे आहेत.
एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना दणका बसणार आहे. त्यामुळे त्यांची इत्यंभूत माहिती मागविली आहे.