कर्जत,दि.१७ :-तालुक्यातील जलालपूर गावाच्या शिवारात प्रकाश झगडे यांच्या शेतात असलेली कोप्याची ताटीचा (दरवाजा ) उघडुन चोरट्यांनी आत प्रवेश करून प्रकाश झगडे यांचे तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरांनी पळवून नेले.
मोबाईल चोरी गेलेली गोष्ट झगडे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस पाटील सांगळे व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती दिल्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ घटना स्थळी पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्यासह घटनास्थळी तातडीने रवाना केले.
पोलीस अधिकारी यांनी प्रकाश झगडे आणि पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले. झगडे व ग्रामस्थांनी पाठलाग करून आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील आरोपी समिर आस्मान्या ऊर्फ नितीन चव्हाण, वय 19 वर्ष, रा.कोरेवस्ती,भांबोरा,ता.कर्जत याने त्याच्या ताब्यातील चाकु ने जिवे मारण्याच्या उद्देशाने कपाळावर वार केला. परंतु झगडे यांनी त्यास पकडुन ठेवले. दरम्यान कर्जत पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यास आणि त्याचा दुसरा अल्पवयीन साथीदार यास ताब्यात घेतले.
जलालपूर परिसरातून त्यांचे दोन साथीदार पळुन गेले. आरोपींविरुद्ध गुन्हा क्र. 752/2021 भा.द.वि 457, 458, 380, 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याची पाच दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे व पो.कॉ सचिन वारे हे करत आहेत. सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेले तीन मोबईल व एक चाकु ताब्यात घेण्यात आला आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे