पुणे, दि. ०७ : दोन सीन असो किंवा कथा, चित्रपट प्रवाही असेल तर प्रेक्षक खिळून राहतोच मात्र त्याही पलीकडे तो ख-या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत दिग्दर्शक काय म्हणतोय हे सांगण्याचा प्रयत्न करतो, असे विचार ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमात मांडले गेले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते यांनी आज ‘पोरगं मजेतंय’, ‘मेफ्लाय’, ‘गोदाकाठ’, ‘गॉड ऑन द बाल्कनी’, ‘फिरस्त्या’ या चित्रपटांच्या टीमशी संवाद साधला.
‘पोरगं मजेतंय’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, कलाकार शशांक शेंडे, ‘मेफ्लाय’ चित्रपटाचे दिग्दर्शक किरण निर्मल, अभिनेते विठ्ठल जोगदंड, निर्माते स्वप्नील कोल्हे, ‘गोदाकाठ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, निर्माते कृष्णा सोरेन, ‘गॉड ऑन द बाल्कनी’चे दिग्दर्शक बिस्वजीत बोरा, ‘फिरस्त्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विठ्ठल भोसले, अभिनेते हरीश बारस्कर, समर्थ जाधव, सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर व निर्मात्या डॉ. स्वप्ना भोसले आदी उपस्थित होते.
कोविड काळात आलेली अनिश्चितता, त्यातून बाहेर पडू की नाही याची आंतरिक भीती, धडपड हे एके बाजूला अनुभवीत असताना व्यक्त होण्याची व डोक्यातील कथा मांडण्याची संधी ‘पोरगं मजेतंय’ या चित्रपटाने आम्हाला दिली. असे सांगत चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले, “मुलगा वडील या नात्यातील धागा दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटात आम्ही केला आहे. आयुष्यातील प्रवासाद्वारे चित्रपटातील प्रवाहीपणा अधोरेखित केला असून निसर्ग आणि मानवी भावना यांचा मिलाफ साधत एक कथा गुंफण्याचा आणि ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.”
चित्रपटाच्या लेखनापासून सहभागी होण्याचे प्रिव्हिलेज दिग्दर्शकाने मला दिल्याने एक प्रकारची लक्झरी एक अभिनेता म्हणून माझ्या वाट्याला आली. ‘पिफ’मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डोकं मोकळं झाल्याची भावना आता अनुभवीत आहोत, असे अभिनेते शशांक शेंडे यांनी आवर्जून सांगितले.
‘मेफ्लाय’ हे एका किड्याचे नाव असून त्याची जीवनयात्रा केवळ २४ तास इतकीच असते, हेच रूपक घेत कथेतील नायकाचा घर सोडून बाहेर गेल्यानंतरचा प्रवास, त्याच्या मनातील हिंदोळा, आठवणींचा पट उलगडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक किरण निर्मल यांनी सांगितले.
नदीचा प्रवाह जसा प्रवाही असतो तसे दोन व्यक्तींचे जीवनही प्रवाही असते. प्रीती आणि सदानंद या दोन व्यक्तीरेखांचा प्रवास दाखविण्याचा प्रयत्न ‘गोदाकाठ’ या चित्रपटात केलेला आहे. चित्रपट करताना घाई नव्हती आम्ही आमचा वेळ घेऊन चित्रपट चित्रित केला. चित्रपटात प्रत्येक ऋतु दाखवायचे असल्याने आम्ही तो वेळ चित्रपटाला दिला, असे गजेंद्र अहिरे यांनी सांगितले. पुरेसा वेळ दिल्याने चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आम्ही ख-या अर्थाने एन्जॉय केली. व्यक्तीरेखा जगण्याचा प्रयत्न केला, असे अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिने नमूद केले.
आसाममधील एका गावात राहणा-या खगेन या नायकाची बायको नुमली जंगली हत्तींच्या हल्ल्यात जखमी होते व तिचा रुग्णालयात मृत्यू होती. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खगेन आपल्या दुचाकीवर मृतदेह नेत असताना दोन पत्रकार ते पाहतात आणि पुढील कथा घडते अशी ‘गॉड ऑन द बाल्कनी’ या आसामी चित्रपटाची कथा असून दिग्दर्शक बिस्वजीत बोरा म्हणाले, “माध्यमांचा चेहरा दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. माध्यमे आपल्या दु:खाचा जो काही बाजार मांडत आहेत हे नायकाला नकोसे होते. यातून सामान्यांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.” चित्रपटाची कथा लिहिताना अभिनेता सुनील शेट्टी याला आवडली होती. मात्र पुढे जेव्हा ती पूर्ण झाली तेव्हा मला माझ्या आसाममधील नायक समोर आला. केवळ कथेला समर्पक नायक असावा या उद्देशाने मी आसाममधील नायक निवडला, अशी आठवण देखील बोरा यांनी सांगितली.
आर्थिक व सामाजिकरित्या खालच्या स्तरातील नायक, निरक्षर मात्र तरीही दूरदृष्टी असलेले त्याचे वडील यांची आणि मुलाच्या प्रेरणादायी प्रवासाची कथा ‘फिरस्त्या’ या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांनी दिली.
नायकाची परिस्थितीला संयमाने सामोरे जातानाची वाटचाल यामध्ये पहायला मिळते. स्वत:चा संघर्ष डोळ्यासमोर ठेवत ही कथा लिहिली. मात्र दृश्य माध्यमातून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या विचाराने चित्रपट तयार केला असे सांगत भोसले म्हणाले, “व्यक्तीरेखा साकारणा-या योग्य चेह-याच्या शोधात मी होतो. मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीसाठी तर खूप शोध घेतला. शेवटी जशी हवी होती तशी व्यक्तीरेखा साकारणारे कलाकार जोडले गेले याचा आनंद आहे.” चित्रपट करताना घरच्यांची समर्पक साथ ही महत्वाची असते असेही भोसले यांनी सांगितले.