पुणे, दि.०४: -आपला चित्रपट हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या व्यासपीठावर प्रदर्शित होतोय, त्याला रसिक प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत, त्यांना चित्रपट आवडतोय, याचा आनंद हा वेगळाच आहे, अशा भावना आज महोत्सवाअंतर्गत दाखविण्यात येत असलेल्या आणि विविध विभागात समाविष्ट असलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेते व अभिनेत्री यांनी व्यक्त केल्या.
लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाअंतर्गत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते यांनी आज टक टक, तेन, गोत, कत्तील आणि फन’रल या चित्रपटांच्या चमुंशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
‘टक टक’ चित्रपटाचे पटकथाकार विशाल कुदळे आणि आशिष कलारिया, तेन या तमिळ चित्रपटातील अभिनेत्री अबरनाथी, गोत चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे, निर्मात्या व अभिनेत्री किरण बागडे, कत्तील चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते ई. व्ही. गणेशबाबू व श्याम, फन’रल चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दुबे, पटकथाकार रमेश दिघे, अभिनेते आरोह वेलणकर, हर्षद शिंदे व सिद्धेश पुजारे आदी या वेळी उपस्थित होते.
‘टक टक’ चित्रपटाचा नायक असलेला विशाल हा शालेय मुलगा काही कारणाने सलग तीन दिवस त्याच्या वर्गात अडकतो. त्याचा तीन दिवसांचा हा काहीतरी शिकण्याचा आणि उमगण्याचा प्रवास चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत चित्रपटाचे पटकथाकार विशाल कुदळे म्हणाले, “संकटात अडकल्यानंतर आमचा नायक बाहेर पडण्याची धडपड करत आहेच मात्र, याबरोबरच यादरम्यान तिथल्या काही गोष्टी त्याला आवडतायेत, तो त्या अनुभवतोय, त्यातून शिकतोय. त्याचा बंधिस्त चार भिंतीमधील प्रवास या चित्रपटात पहायला मिळेल.”
चित्रपटात विशाल या पात्राची कथा साकारणारा अनिश गोसावी याने उत्तम अभिनय केला असून त्याने ८० ते ९० % सीन हे एकाच टेकमध्ये दिल्याचे सांगत आशिष कलारिया म्हणाले, “अनिशची आणि एकूणच लहान मुलांची उमजण्याची शक्ती ही खूप चांगली असते, याचा प्रत्यय आम्हाला या दरम्यान आला.”
प्रत्येक माणूस हा मनातील व बाहेरील अशी दोन आयुष्ये जगात असतो. शाळेच्या वर्गात अडकलेल्या विशालची बाहेर पडण्याची धडपड प्रेक्षकांनी अनुभवावी अशी आमची इच्छा होती. काल ‘पिफ’अंतर्गत झालेल्या शोमध्ये ते देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. हा आनंद आम्हाला अनुभवायला मिळाला, असे मत विशाल कुदळे यांनी आवर्जून नमूद केले.
यानंतर ‘तेन’ या तमिळ चित्रपटातील अभिनेत्री अबरनाथी यांच्याशी समर नखाते यांनी संवाद साधला. तेन चित्रपटातील नायक वेलू हा निलगिरीच्या जंगलातील डोंगराळ भागात राहत असतो. औषधी मध गोळा करून निसर्गाच्या सान्निध्यात तो आपले आयुष्य व्यतीत करत असतो. त्याची चित्रपटातील नायिका पुंगुडी हिच्याशी ओळख होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते, लग्न होते आणि त्यांना मलार नावाची मुलगी होते. पुढे जंगलातील नदीत एका कंपनीने सोडलेले दुषित पाणी प्यायल्याने पुंगुडी आजारी पडते. तिचे उपचार करीत असताना वेलूला येणा-या समस्या आणि त्याचा प्रवास ‘तेन’ या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
आपल्या अभिनयाबद्दल बोलताना अबरनाथी म्हणाल्या, “निसर्गाच्या सान्निध्यात राहणा-या आदिवासी नागरिकांची अवस्था या मधून दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचे जीवन इतकी वर्षे निसर्गावर अवलंबून तर आहेच मात्र पैसा, आधारकार्ड, आरोग्याच्या सोयी यादेखील त्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. बाहेरून येणा-या आणि आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचे विद्रुपीकरण करणा-या लोकांमुळे या स्थानिक, निसर्गात राहणा-या अनेकांना समस्या उद्भवितात. एवढेच नाही तर या समस्यांना सामोरे जातानाचा प्रवास हा अत्यंत वेदनामयी असतो, हे आम्ही चित्रपटांत सांगत आहोत.” अभिनय करताना वेलू आणि पुंगुडी यांचे नाते, मलार या पुंगुडीच्या मुलीशी असलेले नाते दाखविण्यासाठी स्वत: वर काम केले आणि अनेक गोष्टी आत्मसात केल्याचेही अबरनाथी यांनी सांगितले.
‘गोत’ या चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शक शैलेंद्र बगाडे म्हणाले, “ मी मूळचा विदर्भातील. आमच्याकडील भाषेचा लहेजा, शब्द, बोलण्याची पद्धत थोडी वेगळी असल्याने अनेक ठिकाणी आमच्या बोलण्यावर लोकं हसतात. आमची भाषा शुद्ध नसली तरी, आमच्या संस्कृती, चालीरिती या समृद्ध आहेत. हे दाखविण्याच्या उद्देशाने मी चित्रपट क्षेत्राकडे वळालो. ‘गोत’ या चित्रपटाच्या कथेद्वारे गोंड, कोरकू या आदिवासी जमातींमधील श्रद्धा, दंतकथा, चालीरिती आम्ही दाखविल्या आहेत.” आदिवासी जमातीत बोलले जाणारे अनेक शब्द, संकल्पना आज नामशेष होत आहेत. या चित्रपटाद्वारे त्याचे संवर्धन करीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे आम्हाला समाधान आहे असे मत चित्रपटाच्या निर्मात्या व अभिनेत्री किरण बगाडे यांनी व्यक्त केले.
‘कत्तील’ या तमिळ चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शक व अभिनेते ई. व्ही. गणेशबाबू म्हणाले, “कत्तील या शब्दाचा अर्थ कॉट किंवा पलंग असा आहे. एका कुटुंबात पिढ्यानपिढ्या म्हणजे तब्बल ३०० वर्षे चालत आलेला पलंग हाच चित्रपटाचा नायक आहे. आपला एखाद्या वस्तूवर जीव असतो, तसा त्या वस्तूलाही जीव असतो, हे लक्षात घेत त्या वस्तूभोवती काही पिढ्यांची कथा गुंफण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. केवळ डोक्याने विचार न करता भावनात्मक विचार करीत आपला वर्तमानकाळ हा भूत व भविष्यकाळाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.” या चित्रपटात मराठी अभिनेत्री सृष्टी डांगे यांनी भूमिका असून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखिक बी. लेनिन यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असल्याचे श्याम यांनी नमूद केले.
एखाद्या घरात मृत्यू झाला तर ते कुटुंब वेगळ्याच मानसिक अवस्थेत असते. अशा वेळी शेजारीपाजारी, नातेवाईक हे पुढे येत त्या व्यक्तीच्या अंतिम प्रवासाची तयारी करतात. हे करीत असताना चाळीतल चार तरुणांना एक वेगळाच मार्ग सापडतो याची कथा ‘फन’रल’ या चित्रपटात पहायला मिळते. याविषयी सांगताना पटकथाकार व निर्माते रमेश दिघे म्हणाले, “चाळीत राहत असल्याने एखादा माणूस गेल्यावर अंतिमक्रिया करण्याची तयारी करण्याचे प्रसंग अनेकदा आले, त्यातूनच ही कथा उभी राहिली. चाळीतले हे प्रसंग पडद्यावर दाखविण्याचा हा प्रयत्न आहे.
मृत्यूकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन या चित्रपट समोर येतो असे दिग्दर्शक विवेक दुबे यांनी सांगितले. अभिनय करताना त्या परिस्थितीत व्यक्त कसे व्हावे हा प्रश्न मला एक दोन सीनवेळी पडला. त्या वेळी चाळीतील लोकांशी मी कनेक्ट झालो आणि काही मिनिटांत त्या भावना ‘क्लिक’ झाल्या, अशी आठवण अभिनेते आरोह वेलणकर यांनी सांगितली.