पुणे, दि.25: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळस्तरावर आयोजित फेरफार अदालतीद्वारे पुणे जिल्ह्यात तब्बल 10 लाख नोंदी घेण्यात आल्या असून त्यापैकी 9 लाख 73 हजार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात घेण्यात येत असलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी, फेरफार नोंदी निर्गत करण्याचे काम गतवर्षभरापासून सुरू आहे. 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये एकाच दिवसात 3 हजार 361 नोंदी निर्गत करण्यात आल्या.
मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणूका
नोंदी निर्गतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑक्टोबर 2020 पासून प्रत्येक मंडळस्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 98 मंडळ मुख्यालयात झालेल्या फेरफार अदालतीत शेतकरी, खातेदार यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला.
प्रलंबित 21 हजार 561 नोंदीपैकी ज्या 11 हजार 278 नोंदी 15 दिवसांची मुदत पूर्ण होऊन मंजुरीस उपलब्ध झाल्या आहेत, त्यापैकी 3 हजार 361 नोंदी निर्गत करण्यात आल्या. तसेच नागरिक तसेच खातेदारांना निर्गत नोंदीचे सातबारा व फेरफार वाटप करण्यात आले. उर्वरित 10 हजार 283 नोंदी तलाठी स्तरावर मुदत पूर्ण होण्यावर प्रलंबित आहेत. तलाठी स्तरावरील प्रलंबित नोंदींच्या नोटीसा काढणे व बजावण्याबाबत गतीने प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांच्या फेरफार नोंदी तात्काळ निर्गत करण्यासाठी प्रशासन यापुढेही तत्परतेने कार्यरत राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली आहे.
10 लाख नोंदीचा टप्पा पार
मागील एक वर्षात 3 लाख नोंदी घेत त्या निर्गत करण्यात आल्या आहेत. 2021 मध्ये फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 24 नोव्हेंबर रोजी 10 लाख नोंदी घेण्याचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला. पुणे जिल्ह्यात संगणकीय प्रणालीमध्ये नोंदी भरण्यास प्रारंभ केल्यापासून एकूण 10 लाख 983 नोंदी झाल्या आहेत. या नोंदीपैकी 9 लाख 73 हजार नोंदी निर्गत असून निर्गतीचे प्रमाण 97.14 टक्के आहे. नोंदी घेण्यात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गत
24 नोव्हेंबर रोजीच्या फेरफार अदालतीद्वारे हवेली तालुक्यात 315, पुणे शहर 11, पिंपरी चिंचवड 84, शिरुर 270, आंबेगाव 163, जुन्नर 231, बारामती 776, इंदापूर 204, मावळ 241, मुळशी 134, भोर 111, वेल्हा 40, दौंड 194, पुरंदर 170 आणि खेड तालुक्यात 417 अशा एकूण 3 हजार 361 फेरफार नोंदी निर्गतीचे काम पूर्ण करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रलंबित तक्रार प्रकरणांची संख्या 4 हजार 173 इतकी असून हे कामकाज पूर्ण करुन निर्गत करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ई-हक्क प्रणालीवर लॉगीन करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाचा वापर करावा. नागरिकांनी ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.