बेळगाव,दि.२५:- ट्राफिक पोलिसांची दंडात्मक कारवाई चुकविण्यासाठी बहुतांश मोटारसायकलचालक अत्यंत हलक्या दर्जाचे हेल्मेट वापरत असल्याचे संपूर्ण भारतात दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे.अधिवेशन संपल्यानंतर हलक्या दर्जाची हेल्मेट परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यासह आयएसआय मान्यताप्राप्त नसलेली हेल्मेट देखील जप्त केली जाणार आहेत.
एखाद्यावेळेस वाहन अपघात घडल्यास डोकीला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने हेल्मेट सक्ती केली आहे. त्याची पोलिस खात्याकडून अंमलबजावणी केली जात असून विना हेल्मेट वाहने चालविणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, बहुतांश वाहनचालक चांगल्या दर्जाचे हेल्मेट न वापरता अत्यंत हलक्या दर्जाची हेल्मेट वापरत आहेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक पोलिस कारवाई करतात केवळ त्या ठिकाणी डिकीवर हेल्मेट घालण्यात येते.
खरेतर आयएसआय मान्यताप्राप्त हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. पण, हलक्या दर्जाच्या हेल्मेटवर देखील आयएसआय हॉलमार्क घालण्यात येत आहे त्यामुळे ही देखील चिंतेची बाब बनली आहे. बंगळूरमध्ये वाहतूक पोलिसांकडून हलक्या दर्जाची हेल्मेट वापरणाऱ्यावर सातत्याने जप्त केली जाते. बेळगावात मात्र याकडे दुर्लक्ष केले जात होते.पुढील महिन्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर हलक्या दर्जाची हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यासह तशी हेल्मेट देखील जप्त केली जाणार आहेत. त्यामुळे यापुढे वाहनचालकांना चांगल्या दर्जाची हेल्मेट वापरावी लागणार आहेत.
“पुढील महिन्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने पोलिस खाते बंदोबस्ताच्या नियोजनात व्यस्त आहे. अधिवेशन संपताच हलक्या दर्जाची हेल्मेट वापरणाऱ्यावर कारवाई केली जाईल. तत्पूर्वी आयएसआय मान्यता प्राप्त हेल्मेट वापरण्या संदर्भात जागृती केली जाईल.”
- शरणाप्पा, सहायक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा.