श्रीगोंदा, दि. ११ – जिल्हा विधि सेवा प्राधिकरण श्रीगोंदा यांच्यावतीने शासकीय योजनांची जनजागृती आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ याबाबत व बाल दिनानिमित्त रविवार दि. १४ नोव्हें २०२१ रोजी सकाळी १० ते ५.३० वा श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. व्ही. घुगे साहेब व न्यायमुर्ती एस. जी. मेहरे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हान्यायाधिश तथा विधी सेवा समिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर चे अध्यक्ष एस. व्हि. ऐरलागड्डा साहेब, तसेच सचिव श्रीमती रेवती देशपाडे मॅडम व आर.डी. चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत या शिबीराच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीगोंदा येथील जिल्हान्यायाधिश मुजीब शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
या शिबीरात महसुल विभाग,जिल्हा परिषद,कृषी विभाग,पोलीस विभाग,आरोग्य विभाग,वन विभाग,पशु वैद्यकीय विभाग,आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण आदि विभागांनी सहभाग घेवून विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार करुन काही नागरीकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.बि-बियाणे माहितीसाठी राहुरी कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन बारामती,धर्मादाय संस्था यांच्या सह सुमारे ६०-७० स्टॉल उभारले जाणार आहेत. या शासकिय योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्रीगोंदा येथील जिल्हान्यायाधिश शेख यांनी केले आहे.
मा.उच्च न्यायालयाने प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम घेण्यात सांगितला आहे. तो कॅम्प श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आला आहे. ही श्रीगोंदे करांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
या मेळाव्यात विविध शासकिय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक शासकिय विभागानुसार जनतेच्या अडी अडचणी समजुन घेवून त्यावर जागेवरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हान्यायाधिश शेख यांनी सांगितले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे