पुणे, दि.०५ :- पुणे शहरात सर्वत्रच दिवाळी सन उत्साहात साजरी होत असतानाच पुण्यात मुंढवा परिसरात राहणार्या महसूल विभागातील एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्याच्या घरात धाडसी चोरी झाली आहे. सेवानिवृत्त अधिकार्याचा मुलगा आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये आहे चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे वजनाचे म्हणजेच दीड किलो सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रूपये असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज लंपास केला आहे.याप्रकरणी दत्तात्रय संभाजी डोईफोडे (64, रा. ज्ञानेश्वरी बंगला सर्व्हे नं. 55, प्लाूट नं. 24, डेक्कन पेपरमिल रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोईफोडे हे महसूल विभागातून मोठया पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव सागर दत्तात्रय डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीरमध्ये आहे. गुरूवारी लक्ष्मी पूजन असल्याने दत्तात्रय डोईफोडे यांनी घरातील जवळपास सर्वच पारंपारिक दागिने पूजनामध्ये ठेवले. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगडया, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या तसेच हिर्याचे सेट आणि रोख रक्कम 2 लाख 50 हजार रूपयांचा समावेश होता. एकुण 150 तोळे वजनाचे दागिने आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज पुजनामध्ये ठेवण्यात आला होता.
डोईफोडे यांचे घर गुरूवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरटयाने बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून व हॉलचे खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. आणि पूजनामधील सर्व दागिने आणि रोख रक्कम असा एकुण 43 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. मुंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि पुणे शहर गुन्हे शाखेचे अधिकारी चोरटयांचा शोध घेत आहेत.