पुणे, दि.३१ :- केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यामध्ये या सायकल रॅलीला सारसबाग येथून सुरुवात झाली. पुढे बाजीराव रोडमार्गे शनिपार, अप्पा बळवंत चौकातून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून अलका टॉकीज चौक, खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती झाली.
यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, पुणे शहर पदाधिकारी युवराज पारीख, सनी गवते, आकाश शिंदे, अक्षय फुलसुंदर, परेश खांडके, ज्ञानंद कोंढरे, कुणाल धनवडे, दशरथ किरीड, चेतन चव्हाण, मनीषा वाघमारे, कुणाल पवार, मनीष घरत व युवासैनिक उपस्थित होते
‘हेच का अच्छे दिन?’ असा सवाल करत युवासेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले असल्याचा आरोप देखील यावेळी निषेध कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी युवासेनेने इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या माध्यमातून इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली आंदोलनाचे आयोजन केले गेले. संपूर्ण राज्यांतील जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याकरिता याचा तीव्र निषेध म्हणून युवासेनेने सायकल रॅली काढली होती. रविवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन झाले.