पुणे, दि.३० :- पुणे शहरातील गुन्हेगारी हद्दपार करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी संपवायची विडाच उचलला आहे. त्यानुसार मकोका कायद्याचा सक्षमपणे वापर करीत कारवाईचा बडगा उगारला आहे.पुणे शहर आयुक्त पदाची सूत्रे स्विकारताच मकोका, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देउन गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्यानुसार मागील काही महिन्यात मकोका नुसार कारवाईचे त्यांनी अर्धशतक केले आहे. सराईत आरोपी बल्लूसिंग टाक टोळीविरूद्ध मकोका ची 50 वी कारवाई करण्यात आली आहे.सराईत आरोपी बल्लूसिंग प्रभूसिंग टाकसह टोळीतील साथीदार उजालासिंग पभूसिंग टाक, सोमनाथ घारोळे, पिल्लूसिंग जुन्नी, जलसिंग दुधानी व गोरखसिंग टाक हे 5 जूलैला मध्यरात्रीच्या सुमारास पंचरत्न सोसायटीमध्ये दरोडा टाकून पळून जात होते. त्यावेळी घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी अंमलदार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपींनी पोलीसांवर धारदार हत्याराने हल्ला केला. याप्रकरणी त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. टोळीप्रमुख बल्लूसिंग टाक संघटीत गुन्हेगारी टोळी चालवून सन 2008 पासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले.आर्थिक फायद्यासाठी दरोडयाची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगुन दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे टोळीने केले आहेत. यापुर्वी त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यावतीने कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार टोळीविरूद्ध मकोका नुसार कारवाई करण्यात आली आहे.शहरातील नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावे, त्यासाठी गुन्हेगारी रोखण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः संघटित गुन्हेगारी टोळ्यांना धडा शिकविण्यासाठी मकोका नुसार कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी घटण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसंदर्भात वेळोवेळी खबरदारी घेण्यात येत आहे. सदर कारवाई ही पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त , पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर ,संजय शिंदे ,पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ३ पुणे शहर श्रीमती पौर्णिमा गायकवाड ,सहायक पोलीस आयुक्त , कोथरूड विभाग , पुणे शहर गजानन टोम्पे , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कोथरूड पोलीस ठाणे मेघश्याम डांगे , पोलीस निरीक्षक , गुन्हे , बाळासाहेब बडे , सर्वेलन्स पथकातील पोउनि भैरवनाथ शेळके , पोना सचिन कुदळे , पोना भास्कर बुचडे , व पोशि अजय सावंत कोथरूड पोलीस ठाणे यांनी वेळेत तयार करून कोणत्याही त्रुटीविना वरिष्ठ कार्यालयास सादर करून उत्तम कामगिरी केली आहे .पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली वर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत आतापर्यंत ५० कारवाई करण्यात आलेल्या आहेत .