पिंपरी, दि. ११ : – पिंपरी-चिंचवडकरांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार व नगरसेवक सागर आंगोळकर मित्र परिवाराच्या वतीने मोफत ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नागरिकांना योग व शारीरिक व्यायाम शिकवण्याबरोबरच हास्य मनोरंजन आणि आनंदी जीवनाचा मंत्र देण्यात येणार आहे. शुक्रवारी १४ मेपासून दररोज दिवसांतील काही तास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी https://rugnaseva.ruha.co.in/ या लिंकवर क्लिक करून पिंपरी-चिंचवडकरांना या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना आपले नाव आणि राहणाऱ्या ठिकाणाची नोंदणी करावी लागेल. शुक्रवारी १४ मेपासून सकाळी ७ ते ८ या वेळेत योगसाधना, दुपारी १२ ते २ या वेळेत आनंदी जीवनाचा मंत्र, दुपारी ४ ते ५ या वेळेत पिंपरी-चिंचवड कलाकार महासंघाचा हास्य मनोरंजन आणि दुपारी ५ ते ६ या वेळेत शारीरिक व्यायाम शिकवले जाणार आहेत.चला कोरोनाशी लढू आणि जिंकूया. योग, व्यायाम, भरपूर हास्य, सकारात्मक विचाराद्वारे आपली प्रतिकारशक्ती वाढवून एकत्र संघर्ष केला तरच हे शक्य आहे. सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी लोकप्रिय व आरोग्यदायी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना घरबसल्या मोफत ऑनलाइन मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. दररोज ऑनलाइन होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊन योग, व्यायाम, भरपूर हास्य, सकारात्मक विचाराद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाशी लढू आणि जिंकूया, असे आवाहन माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले आहे.