कर्जत दि ०६ :- कोरोना सारख्या भयानक संकटामध्ये केंद्र व राज्यशासन, इतर स्वयंसेवी संस्था सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी रेशनद्वारे धान्य कसे पोहचेल असा प्रयत्न करत असताना गोरगरिबांच्या हक्काचे रेशनवर डल्ला मारून रेशनिंगचा काळाबाजारात जाणारा तांदूळ, गहू कर्जत पोलिसांनी पकडला. ८२गोण्या तांदूळ, ८गोण्या गहू, दोन चारचाकी वाहने असा १० लाख ४४हजार रूपयांचा मुद्देमाल कर्जत पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी राशीन- कर्जत रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली. तीन जनाविरूद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे. बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय २५), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय ३९), श्रीकांत प्रकाश ढेरे (वय २५)हे सर्व रा. विटा ता. करमाळा जि. सोलापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
करमाळा तालुक्यातील काही इसम हे रेशनिंगचा तांदूळ आणि गहू नागरिकांना न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करणार आहेत, अशी माहिती कर्जत पोलिसांना समजली. पोलिसांनी राशीन- कर्जत रोडवर सापळा लावत दोन वाहने अडविली. त्यात धान्य आढळून आले. त्यांना या धान्य बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा माल हा रेशनिंगचा असून काळ्या बाजारात विक्री करणार होतो असे कबूल केले.
सदर कारवाई कामी करमाळा तहसीलदार समीर माने, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, तलाठी प्रशांत गौडचर यांची मदत झाली.उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकटे यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे