श्रीगोंदा दि ०६ :- कै.शिवराम आण्णा दशरथ पाचपुते स्मरणार्थ विजयालक्ष्मी वृक्षमित्र संघटना काष्टी यांचे तर्फे आज मढेवडगाव येथे विलगीकरण कक्ष व हंगेश्वर कोविड केअर सेंटर चिंभळे यामध्ये जे काही पेशंट बरे होऊन घरी जात आहेत.त्यांना घरी जाताना आपल्या पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून संघटनेच्यावतीने कोरोनावर मात केलेल्या रुग्णास एक झाड देण्यात आले.ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. जगण्याच्या लढाईत ऑक्सिजन हा सर्वांत महत्त्वपूर्ण घटक असून, कोरोनाच्या संकटाशी जग आज लढत असताना ऑक्सिजनची गरज वाढली आहे.त्यामुळे झाडे लावणे ही काळाची गरज आहे.हे लक्षात घेऊन विजयालक्ष्मी वृक्षमित्र संघटना काष्टी येथील अध्यक्षा पूजा श्रीकांत पाचपुते यांची ही अनोखी संकल्पना असल्याने त्यांचे या सामाजिक कामाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी प्रामुख्याने कडुलिंब, चिंच,सीताफळ, जांभूळ,लिंब, वड तसेच तुळस आदी रोपे देण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत आहे.औद्योगिकरण व यांत्रिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली. पण त्याच प्रमाणात झाडे लावली नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन मिळणेही कठीण होते. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन विकतही मिळत नाही. ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून ते जगवावे. त्यामुळे काय होईल जेवढी लोकसंख्या तेवढी झाडे तयार होतील. येणारा काळ आपल्यासाठी सुरक्षित राहील. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्याघरी किंवा शेतात किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन विजयालक्ष्मी वृक्षमित्र संघटना अध्यक्षा पूजा श्रीकांत पाचपुते यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे सचिव परशुराम खोरे,संचालक गणेशजी मांडे, सागर सुपेकर व नामदेव खोरे,सरपंचपती प्रा.फुलसिंग मांडे, ग्रा.सदस्य दीपक गाडे,प्रमोद शिंदे,विजय उंडे, ज्ञानदेव साळवे, शुभम वाबळे,शुभम ससाणे आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे