श्रीगोंदा दि २३ :- गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.राज्यशासनाला कोरोनाची दुसरी लाट येणार आहे अशी माहिती वैज्ञानिकाकडून मिळाली असताना देखील या तीन तिघाडी आणि काम बिघाडी सरकारने कुठलेही ठोस उपाययोजना केल्या नाहीत.कोरोनामुळे राज्यातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन नाही, बेड नाही, ऑक्सिजन तसेच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी सुद्धा नंबर लावावे लागतात. इतकी दयनीय अवस्था आज राज्यातील जनतेवर आलेली आहे. याचा निषेध म्हणून स्मशानभूमीत राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन करून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे,माणिक गाडे,अशितोष गाडे,अनिल मांडे,अभय मांडे,प्रेम मांडे,श्रीकांत मांडे आदी उपस्थित होते.
अशा प्रकारचे आंदोलन शुक्रवारी दि.२३रोजी करण्यात आले. शासन फक्त आरोप प्रत्यारोप करणे व भ्रष्टाचार करण्यातच दंग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोना रुग्णालयातील सर्व प्रश्न, तसेच लॉकडाउन केल्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना अजून कोणतीही मदत नाही. या सर्व गोंधळातील कारभारामुळे जनता भयभीत झाली असून, जनतेला राज्यात कोणीच वाली राहिलेला नाही. कोरोना रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात, एखाद्या गरीब घरातील कोणा व्यक्तीस कोरोनाची लागण झाली तर त्या रुग्णास घरातील नातेवाईक खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नेतात.त्यावेळेस हॉस्पिटल मधील डॉक्टर ५०हजार रुपये डिपॉझिट करा असे सांगतात.तसेच वर्षभरापासून कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे सर्वांचेच कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. या गंभीर बाबींकडेसुद्धा राज्य शासनाचे लक्ष नाही. जनतेच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे स्मशानभूमीत राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आल्याचे रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी सांगितले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे