नांदेड, दि ३० : होळी निमित्त मिरवणुकीवरुन नांदेडमध्ये जमावाने थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने हल्ला केला. मात्र एसपी प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी असून रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.
नांदेडमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे, त्यामुळे होळीची पारंपारिक मिरवणूक काढू नये असे सर्वांच्या संमतीने ठरले होते, मात्र तरीही सांयकाळी काही युवकांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून ही मिरवणूक काढली. या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. त्यात चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
त्यासोबतच पोलिसांच्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. यावेळी चित्रीकरण करणारे अनेक मोबाईलदेखील समाज कंटकांनी फोडून टाकले आहेत. पोलीस आता या समाजकंटकाचा शोध घेत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितलंय.
नांदेडमधील होला-मोहल्ला मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकरणात 400 हून अधिक जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 लोकांना अटकही करण्यात आली आहे. या हल्ल्यात 4 पोलिसांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्वांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
होला-मोहल्ला मिरवणूक रोखण्यासाठी पोलिस गेले होते तेव्हा पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि दंड्यांनी हल्ला करण्यात आला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या मिरवणुकीस परवानगी नव्हती. समाजकंटकांनी एसपी आणि डीएसपीच्या गाड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान शीख महिला दगडफेक देखील करताना दिसल्या.