श्रीगोंदा दि ०५: – नगर-दौंड महामार्गावर काष्टी येथील परिक्रमा कॉलेज समोर दि.४ रोजी रात्री ८:३० वाजता रस्त्याने पायी चाललेल्या अज्ञात इसमाला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक देवून उडविले.या अज्ञात इसमाचे वय ३० ते ३५ वर्षे इतके असल्याचा अंदाज आहे.या अपघातात अनोळखी इसम जागीच ठार झाला. या घटनेचे वृत्त हे काष्टी परिसरात जावुन धडकताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.या इसमाची मात्र अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरुन मात्र अज्ञात वाहन चालक हा वाहनासह फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.वाहन चालक आरोपी गाडीसह फरार झाला. हे.कॉ. गोकुळ दादासाहेब इंगवले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालक आरोपीविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. इंगवले हे अज्ञात वाहनाचा शोध घेत असून मयताची ओळख शोधत आहेत. नगर – दौंड रस्त्यावर अनेक अपघात होत असून वाहन चालक भरधाव वेगात वाहने चालवित असल्याने रस्त्यावरील अपघात वाढले आहेत.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अपघाती क्षेत्रावर तातडीने गतिरोधक बसवून घ्यावे अशीही मागणी काष्टी परीसरातील महिला भगिनींनी व नागरीकांनी केली आहे.
पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.दादा टाके, पो.कॉ.किरण बोराडे,हे.कॉ.इंगवले हे करीत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे