_दूधवाढीचा मंत्र- मूरघास तंत्र_
पुणे दि २० ‘- महाराष्ट्र शासनाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मूरघास निर्मितीवर मोफत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा बुधवारी, 20 जानेवारी 2021 रोजी दुपारी तीन वाजता पोक्रा महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवरून (https://youtu.be/YVE999NRV_0) लाईव्ह होणार आहे. सर्व स्तरांतील शेतकरी, उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सभासद यामध्ये सहभागी होऊ शकतात.
पोक्रा प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग आणि दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाचे तज्ञ मार्गदर्शक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. मूरघास निर्मिती तंत्रज्ञान व त्यातील व्यवसाय संधी या विषयावर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, मूरघास तयार करणारे यशस्वी शेतकरी यावेळी संवाद साधून मनोगत व्यक्त करणार आहेत. पोक्रा’च्या वतीने मूरघास निर्मिती व्यवसायासाठी करण्यात येणारे साहाय्य याबद्दल शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
मूरघास पद्धतीने कमीत कमी खर्चात आपण जनावरांसाठी बारमाही हिरवा चारा उपलब्ध करू शकतो. टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. मुरघासामुळे मात्र उन्हाळ्यातही खात्रीशीर हिरवा चारा उपलब्ध होऊन खर्चात मोठी बचत होते. शेतकरी गटांना आणि शेतकरी उत्पादक कंपनीना ह्यातून व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने https://youtu.be/YVE999NRV_0 या लिंकवरून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोक्रा व पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
……..
कार्यशाळा सर्वांसाठी –
शेतकरी, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचतगट, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्य असे सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
…….
मूरघास म्हणजे…
मूरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). वैरणीचा कस फारसा कमी न होऊ देता हवाबंद व पाणी झिरपणार नाही अशा खड्ड्यात ओली वैरण साठवून ठेवण्याच्या पद्धतीस सायलेज तथा मूरघास करणे असे म्हणतात.