पुणे, दि. 15– एकाच व्यक्तीने एकाच ठिकाणी बोन्सायची (वामन वृक्ष) 3 हजार 333 झाडे असण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड( विश्वविक्रम ) प्राजक्ता गिरीधारी काळे यांनी केला. वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. गेल्या 35 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर विविध वृक्षांच्या सुमारे दीडशे प्रजाती प्राजक्ता काळे यांनी विकसित केल्या. त्या निमित्ताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्यावतीने आज पहाणी करुन निर्णय जाहीर करण्यात आला.
या कार्यक्रमास वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, प्रतापराव पवार,विठ्ठलशेठ मणियार, गिरीधारी काळे, डॉ. के.एस. संचेती, उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ऋषीनाथ मेहता, वनसरंक्षक रंगनाथ नाईकडे, उप वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. उपस्थित होते.
वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी काळे दाम्पत्याचे अभिनंदन करुन सरकारच्यावतीने शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, प्राजक्ता काळे यांनी बोन्साय कलेच्या माध्यतातून पुणे शहराचा नावलौकीक राज्य, देश आणि जागतिक पातळीवर वाढविला. यापूर्वी मी काळे ताईंच्या बोन्साय प्रदर्शनास भेट दिली होती. ते प्रदर्शन पाहून सुंदर, अप्रतिम हे शब्द कमी पडतील, असे ते प्रदर्शन होते. बोन्साय म्हणजेच वामनवृक्ष ही कला मूळ भारतीय आहे, मात्र इतर कलांप्रमाणे तिचे जतन न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भारत देशात ‘शून्य आयात आणि शंभर टक्के निर्यातीत मोठा सहभाग’ हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरजही त्यांनी प्रतिपादन केली. पर्यावरणाच्या सरंक्षणाचे महत्तव विशद करताना श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या स्वत:साठी तसेच इतरांसाठी संरक्षण करण्याचे आवाहन केले. धन हे या जन्मीच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येते, तर वन हे पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासासाठी कामी येते, असे ते म्हणाले. बोन्साय कलेल्या वाढीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.
वन विभागाचे सचिव विकास खारगे म्हणाले, प्राजक्ता काळे यांनी समर्पण आणि त्यागाच्या भावनेतून बोन्साय कला जोपासली. मुंबईसारख्या महानगरांमध्ये बोन्साय कलेला मोठी संधी आहे. यातून रोजगारही निर्माण होऊ शकतो. महिलांना प्रशिक्षण दिल्यास त्यांना यातून रोजगार प्राप्ती होऊ शकते.
यावेळी प्रतापराव पवार, विठ्ठलशेठ मणियार, गिरीधारी काळे, डॉ. के.एस. संचेती, उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.