पुणे,दि.१६- केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराला जागतिक स्तरावरील शहर बनविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे महापालिका व महामेट्रोच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणा-या कर्वेनगर भागातील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खा. संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, आ. माधुरी मिसाळ, आ. विजय काळे, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, योगेश गोगावले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुणे शहरासाठी राबविण्यात येणा-या विविध विकास योजनांचा उल्लेख केला. पुणे शहरात महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विणण्यात येत असून यामुळे वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय होईल. एखादे शहर जागतिक स्तरावर विकसित होत असेल तर त्यामध्ये तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा असतो.
मेट्रो हा वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. ही सुविधा प्रदूषणमुक्त, वेगवान आणि सुरक्षित आहे. या वाहतूक सुविधेच्या क्षमतेत वाढही करता येते. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो वाहतूक सक्षम करण्यावर भर दिल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षीत यांच्या कामाचे कौतुक करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मेट्रोचे पहिल्या वर्षी 15 टक्के काम होत असते, परंतु पुण्यामध्ये 25 टक्के काम झाले.
आज भूमिपूजन झालेला उड्डाणपूल हा एक पथदर्शी प्रकल्प आहे. पुणे महापालिकेने या कामासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पुलामुळे भविष्यात वाहतुकीच्या कोंडीवर मात होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेने इलेक्ट्रीक बसेस खरेदी केल्या पाहिजेत,असे सांगून ते पुढे म्हणाले एसी-नॉन एसी तसेच प्रदूषण नसलेल्या बसेसमुळे वातावरण शुध्द राहण्यास मदत होईल. स्वारगेट जवळ मेट्रो, पीएमपीएल, बस सेवेचे ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात येत असल्याचेही मुख्मंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पुणे शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विकासाचा वेग देखील त्याच तुलनेने वाढतो आहे. शिक्षण, आरोग्य व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. कर्वेनगर दुमजली उड्डाणपुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. बापट यांनी व्यक्त केला.
कर्वेनगर दुमजली उड्डाणपूल प्रकल्पाची माहिती नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
उप महापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी केले.