टेंभुर्णी दि २० : – लॉकडाऊन असताना अवैधरित्या विक्री करण्यासाठी देशी-विदेशी दारूचा साठा फॉर्च्युनर जीपमध्ये लपवून सोलापूर जिल्ह्यात घेऊन येत असताना टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून फॉर्च्युनर कार सह २० लाख ४६ हजार २५० रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.ही कारवाई आज १९ मे रोजी दुपारी१२.३० वा. सुमारास भिमानगर येथील पुलाच्या खालील रस्त्यावर करण्यात आली.याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र मगदूम,पोहेकॉ बिरुदेव पारेकर,पोहेकॉ शिंदे,पोना सोहेल पठाण,पोकॉ उस्मानबाशा महमदरफिक शेख असे सर्वजण भिमानगर येथील सरदारजी ढाब्यासमोर थांबले असता त्यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की,इंदापूर येथून भिमा नदीवरील उड्डाण पुलाखालील रस्त्याने टेंभुर्णीच्या दिशेने एक पांढऱ्या रंगांच्या फॉर्च्युनर कार क्र-एम.एच.१३-ऐझेड-४५८५ मधून देशी-विदेशी दारू अवैधरित्या घेऊन येणार आहे.ही माहिती मिळताच सपोनि राजेंद्र मगदूम यांनी पोनि दयानंद गावडे यांनी कळविली असता पोनि गावडे यांनी खात्री करून कारवाई करण्याचा आदेश दिला.त्याप्रमाणे सपोनि मगदूम यांनी दोन इसमाना पंच म्हणून येण्यास सांगितले असता ते तयार झाले.पंच व सर्व पोलीस स्टाफ भीमा नदीच्या पुलावर सापळा रचून फॉर्च्युनर गाडीची वाट पहात थांबले.दरम्यान थोड्या वेळाने १२.३० वा. सुमारास माहिती मिळाल्याप्रमाणे नमूद नंबरची फॉर्च्युनर गाडी टेंभुर्णीच्या दिशेने येताच पोलिसांनी इशारा देऊन ती थांबविली असता चालक एकदम गोंधळून गेला.त्याचा अधिक संशय आल्याने त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने कुणाल सिद्धेश्वर खडके वय-२१ वर्षे,रा.इंदापूर.जि.पुणे असे असल्याचे व सदर फॉर्च्युनर ही वडील सिद्धेश्वर भानुदास खडके यांच्या नावे असून ती स्वतः वापरत असल्याचे सांगितले.त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्याने वाहनांमध्ये १२ हजार ४८० रुपये किमतीची देशी दारू टँगो ५२ प्रति नग किमतीची ५२ नग,६ हजार ४५० रुपये कि.मॅक्डोनाल्ड कं.प्रति नग१५० कि.४३ नग,१२ हजार ६०० रुपये कि.७५० मि.प्रति नग ६०० कि.१२ नग,१४ हजार ७२० कि. ब्लेंडर्स प्राईड कं.प्रति नग ३२० कि.४६ नग गाडीत ठेवलेले व वीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर गाडी असा एकूण २० लाख ४६ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीसह पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केला.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दयानंद गावडे यांच्या आदेशाने सपोनि राजेंद्र मगदूम व त्यांच्या पथकाने पार पाडली.तसेच ही देशी-विदेशी दारू खडके हा टेंभुर्णीतील काही हॉटेल चालकांना अवैधपणे पुरवीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.या कारवाईने देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या घटनेचा अधिक तपास सपोनि राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप