पुणे,दि.२५ :- पुणे परिसरातील नीलेश घायवळ टोळी सदस्य व जांभळी गावचा माजी उपसरपंच पप्पू उर्फ गोरक्ष गोपीनाथ तावरे (वय-35) याचा खून करण्यात आला होता.या गुन्ह्यातील गजा मारणे टोळीतील जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यापैकी 3 जण आठ वर्षापासून तुरुंगात होते. सत्र न्यायाधीश नांदेडकर यांनी शुक्रवारी (दि.24) हा आदेश दिला.या प्रकरणात 13 जणांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यापैकी फिर्यादी असलेल्या मयताच्या पत्नीसह सात जण फितुर झाले. ही घटना पुण्यातील हवेली तालुक्यातील जांभळी गावच्या हद्दीत 8 डिसेंबर 2013 रोजी घडली होती.
ज्ञानेश्वर पाडुरंग तावरे निखिल राजेंद्र पोटघन, अनिल दगडू भगत, प्रविण उर्फ पप्पू तुकाराम पासलकर, रुपेश नातू तावरे, रामदास रघुनाथ पवार आकाश साहू शिंदे आणि अक्षय राजेश जोरी अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर तुषार तुकाराम पासलकर आणि पिंटू तुकाराम पासलकर हे अद्याप फरार असल्याची माहिती अॅड. राहुल भरेकर यांनी दिली. पप्पू पासलकर, रुपेश तावरे आणि अनिल भगत हे 2014 पासून जेल मध्ये होते. तर उर्वरीत आरोपी 2014 मध्ये जामिनावर बाहेर आले होते.बचाव पक्षातर्फे अॅड.. सुधीर शहा, अॅड.. जितेंद्र सावंत, अॅड.. राहुल भरेकर, अॅड.. अनिकेत येवले, अॅड.. संग्राम काटे आणि अॅड.. वैभव मेदणकर यांनी काम पाहिले. मयत तावरे हा जांभळी गाव आणि परिसरात आरोपींना दहशत पसरविण्यात आणि खंडणी उकळण्यास विरोध करत होता.या कारणावरुन आणि पूर्ववैमनस्यातून काठी, कोयत्याने माराहाण करुन गोळ्या घालून खून केल्याचा आरोप सर्वांवर होता.या प्रकरणाचा निकाल आठ वर्षांनी लागला असून आठ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.