पुणे,दि.२५:- पुणे शहरातील तुळशीबागेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी व भुरट्या चोरांना अटकाव करण्यासाठी तुळशीबागेतील व्यापारी संघटनांकडून या भागात खासगी बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत.या बाउन्सरमुळे पुणे महापालिकेस मदतच होणार असली तरी या बाउन्सरकडून नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास त्यांच्यावर पुणे महापालिकाच गुन्हे दाखल होणार आहे,अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या मुख्यसभेत तुळशीबागेत नेमण्यात आलेल्या बाउन्सरबाबत माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर, जगताप यांनी या प्रकरणी माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले होते. याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, तुळशीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना वाढलेल्या आहेत. तसेच अनेक नागरिक या भागात दुचाकी घेऊन जात आहेत. त्यामुळे वर्दळीस अडथळे होत आहेत. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांनीच पुढाकार घेऊन हे बाउन्सर नेमले आहेत.या बाउन्सरमुळे महापालिकेस फायदाच होणार असली तरी, या बाउन्सरमुळे कोणत्याही नागरिकास त्रास झाल्यास अथवा महिलांकडून तक्रार आल्यास संबधितांवर पालिका गुन्हे दाखल करेल, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.