पुणे दि ०३ : -“छोटे व्यावसायिक, महिला व्यावसायिक, घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणी अशा सगळ्यांचे जवळपास १५० स्टॉल पहिले. सगळ्यांकडेच दर्जेदार वस्तू आणि व्यवसायाचा दुर्दम्य विश्वास पाहायला मिळाला. अशा प्रकारचे महोत्सव हे महिला उद्योजकांना व्यासपीठ देणारे ठरत आहेत. त्यातून अनेक महिला सक्षमपणे आपला व्यवसाय विस्तारात आहेत, याचा आनंद वाटतो,” असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोल्डन ट्युलीप इव्हेंट्सच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘घे भरारी’ या फन-फूड महोत्सवाच्या उद्घाटनावेळी मेधा कुलकर्णी बोलत होत्या. शुभारंभ लॉन्स येथे आयोजिलेले हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (दि. ५) सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष अनिता तलाठी, महोत्सवाचे संयोजक राहुल कुलकर्णी, नीलम उमराणी-यदलाबादकर, संदीप चाफेकर, समीर देशपांडे यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हॅण्डमेड दागिन्यांपासून संस्कृतमध्ये लेखन करून त्याचा चित्रातून अर्थ काढून तयार केलेल्या शर्टपर्यंत असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. धारवाडी खाणापासून बनविलेले दागिने, पेपर फिंलिंग फ्रिज मॅग्नेट, ऍक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, भाज्या व फळासाठी फ्रीज बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, परसबागेतील झाडांसाठी खत व बियाणे, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या आदी वस्तू लक्ष वेधून घेत आहेत. तसेच गुळपट्टी, तीळपट्टी, वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी तीळ शेंगदाणेचे लाडू, उपवास खाकरा असे पदार्थ, लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू आहे. भरपूर खेळ, जादूचे प्रयोग, गायनाचे कार्यक्रम व चैताली माजगावकर यांचा ‘पपेट शो’ अनुभवता येणार आहेत. यातील गेम शो मध्ये लहान मुलांसाठी निरनिराळी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. चाळीस पेक्षा अधिक कुल्फीचे प्रकार आणि इतर अनेक पदार्थ व वस्तूंची रेलचेल आहे.मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “एरवी बाजारात पहायला न मिळणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण व कलात्मक वस्तू येथे मांडण्यात आलेल्या आहेत. यातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे. समाजात या प्रकारचे उपक्रम राबविणे जाणे गरजेचे आहे. जुन्या कपड्यापासून केलेल्या पिशव्या, पायपुसणी यासह पर्यावरणपूरक भांडी, नक्षीदार कपडे, विविध मसाले यातून महिला स्वतःला व्यवसायिकतेकडे घेऊन जात आहेत.”राहुल कुलकर्णी म्हणाले,”नोकरी सोडून लोकांनी हळुहळु व्यवसायात उतरावे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. नोकरी सांभाळून जे लोक व्यवसाय करतात अशांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येत आहेत. महोत्सवात दररोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शोचा कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. मनीषा निश्चल यांच्या गाण्यांची मैफल रंगणार आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन व एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि धम्माल गेम्स अनुभवता येत आहे. जवळपास १५० पेक्षा अधिक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. पाटणकर इव्हेंट्स, चीझी क्रेझी, गिरीवन रिसॉर्ट आणि चौगुले मोटर्स यांचे प्रायोजकत्व आहे.”