पुणे दि२३ :-दिवाळीच्या सुट्टी मध्ये मूळगावी जाण्यासाठी नोकरदार व विद्यार्थ्यांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना चाप लावण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत. अवाजवी भाडे आकारल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी मंगळवारी दिला. शहरात मोठय़ा संख्येने परगावचे नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. शहरात वास्तव्यास असणारे विद्यार्थी दिवाळीत मूळगावी परतात. दिवाळीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जाते. वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर खासगी प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक, चालक, कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी अनिल पंतोजी, येरवडा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश साठे, वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक (प्रशासन) किशोर नावंदे या बैठकीत उपस्थित होते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात तसेच सौजन्याने वागावे, प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलीस उपायुक्त देशमुख यांनी बैठकीत दिल्या.
परिवहन विभागाच्या निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. राज्य परिवहन मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या भाडय़ापेक्षा खासगी प्रवासी वाहतूकदारांचे टप्पा भाडे प्रतिकिलोमीटर पन्नास टक्केपेक्षा (दीडपट) जास्त राहणार आहे, असे निश्चित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी वाहतूकदारांनी करणे गरजेचे आहे. प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, थांब्याजवळ सुरक्षारक्षक नेमण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्याचे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी सांगितले. साध्या वेशात पोलिसांची नजर
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्यांवर साध्या वेशातील पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकातील कर्मचारी प्रवासी म्हणून जाणार आहेत. एखाद्या वाहतूकदाराकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.
अवाजवी भाडे आकारल्यास थेट तक्रार करा
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून अवाजवी भाडे आकारले गेल्यास तसेच त्यांच्याकडून काही गैरवर्तन झाल्यास वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स अॅप क्रमांकावर (८४११८००१००) किंवा वाहतूक नियंत्रण कक्षात (दूरध्वनी- ०२०-२६६८५०००) तक्रार करावी. वाहतूक पोलिसांचे ट्विटर खाते @punecitytrafficयेथे तक्रार करावी.