पुणेदि. १४:-पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तील सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पोलीस दलातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल जाधव यांचा यापूर्वी 2001 मध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. 2009 मध्ये पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे गौरव पदक त्यांना प्रदान करण्यात आलं. पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सलग तीनवेळा राष्ट्रपती पदक मिळवणारे राम जाधव हे राज्यातील एकमेव आधिकारी ठरले आहेत. सातारा जिल्ह्यातलं पुसेगाव हे त्यांचं मूळ गाव. सध्या ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, दहशतवाद प्रतिबंधक पथक येथे यांनी चमकदार कामगिरी केलीय. संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडून काढली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केलेल्या प्रमोद माळवदकर, रॉबर्ट साळवे, श्याम दाभाडे, मोबीन शेख, महाकाली ढोकलिया अशा सोळा गुंडाचं त्यांनी एन्काऊंटर केलं. सामान्य जनतेत पोलिसांप्रती विश्वासाचं वातावरण तयार केलं. खंडणी उकळणाऱ्या, लूटमार करणाऱ्या गुंडांना वठणीवर आणलं. व्यापारी वर्गाला सुरक्षित केलं. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना कुणाची फिकीर केली नाही अन कुणाची तमा बाळगली नाही. गुन्ह्याचा माग लावण्याचा त्यांचं कसब अतुलनीय आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणासह कित्येक महत्वपूर्ण प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पोलीस दलातील चमकदार कामगिरीबद्दल आतापर्यंत त्यांना साडेसातशेहून अधिक बक्षीसं मिळालीत. अत्यंत मितभाषी अन प्रसिद्धीच्या झोतापासून कायम चार हात लांब राहणाऱ्या रामचंद्र शिवाजी जाधव या मित्राच्या आज झालेल्या सन्मानानं आम्हा मित्रांना झालेला आनंद शब्दांत मावणारा नाही. जाधव साहेबांचं खूप खूप अभिनंदन…. – बॅच १९८८ पीएसआय – २००१ साली राष्ट्रपती शौर्य पदक – २००९ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक – २०१८ विशेष सेवा राष्ट्रपती पदक – ७५० पेक्षा जास्त बक्षीस – १६ एन्काऊंटर – दाभोळकर हत्या प्रकरणाच्या उकल करण्यात महत्वाचा सहभाग – नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणाची उकल – पुणे ग्रामीण आळेफाटा डबल मर्डर आणि गॅंगरेप प्रकरणाचा छडा – ठाणे शहरातील ट्रिपल मर्डर चा उलगडा