मुंबई, दि. १३ : – राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्न पदार्थातील भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी ‘ॲक्शन मोड’वर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
श्री. रावल म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभाग हा समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारा विभाग आहे. राज्यातील अन्न व औषधाची सुरक्षितता ही जबाबदारी या विभागावर आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या समन्वयाने “टाइम बाऊंड” पद्धतीने कामाचे नियोजन करून मिथ्याकरण व भेसळीचे उच्चाटन करावे. ते काल झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वतंत्र आढावा बैठक वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासन भवन येथे श्री. रावल यांनी घेतली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह दोन्ही विभागाचे राज्यातील सहआयुक्त व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी श्री.रावल यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रमही संपन्न झाला.
अन्न विभागाने आपल्या सादरीकरणात विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल्स तपासणी, नियमित तपासण्या, व्हिजन डॉक्युमेंट, राज्यातील अन्न तपासणी प्रयोगशाळा, अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत केलेली कार्यवाही, क्रॉस चेकिंग, जंक फूड तपासणी मोहीम, स्वस्थ भारत यात्रा, स्ट्रीट फूड हब, दूध व दुग्धजन्य पदार्थ तपासणी व कार्यवाही, विभागातील रिक्त पदे याबाबत विभागाने दिलेल्या माहितीवर श्री.रावल यांनी पुढील कार्यवाहीबाबत तपशीलवार निर्देश दिले. तसेच प्रयोगशाळेची संख्या वाढवणे व रिक्त पदाबाबत बृहत्आराखडा तयार करणे बाबतही आदेश यावेळी देण्यात आले.
यावेळी श्री. रावल पुढे म्हणाले की, अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जबाबदारीने काम केले पाहिजे. विशेषतः दूध, तेल, मिठाई आदी अन्न पदार्थांतील भेसळ ही गंभीर बाब आहे. दूधभेसळ आढळल्यास त्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यावरही जबाबदारी निश्चित करून कार्यवाही केली जाईल. दुधाच्या बाबतीत जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. ‘ॲक्शन प्लान’ च्या माध्यमातून राज्यात आणि विशेषतः मुंबईत काही ठिकाणी होणारी दुधातील भेसळ रोखणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ‘अन्न सुरक्षा पंधरवडा’ राबवण्यात येईल. लोकांना रसायनमुक्त अन्न मिळण्यासाठी या संबंधित विभागातील अधिकारी व लोकांशी चर्चा करून रसायनमुक्त फळे, भाजीपाला, देण्याच्या दिशेने काम केले पाहिजे, असेही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.
औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना श्री. रावल म्हणाले की, लोकांच्या आरोग्याला केंद्रबिंदू मानून विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे. ई-सिगरेट, औषध द्रव्यांचा अंमली पदार्थ म्हणून होणारा वापर रोखणे, मिथ्याकरणाबाबत कडक कार्यवाही करणे, लॅब व मनुष्यबळ वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, राज्यात औषध निर्माण युनिट वाढवणे, शाळा कॉलेजातून जागृती करणे आदी विषयांबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच जागतिक दर्जाच्या औषध निर्माण कंपन्यांना महाराष्ट्रात आमंत्रित करून औषध निर्माण युनिट्स वाढवण्याबाबत ठोस कार्यक्रम तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाविषयी माहिती मंत्री श्री. रावल यांना दिली.
बाळू राऊत प्रतिनिधी