बारामती दि.८ :- शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी केले.
बारामती हॉस्पिटलला आज पालकमंत्री पाटील यांनी भेट दिली. रुग्णालयाच्या विविध कक्षांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय पाटील, बारामती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. दिलीप लोंढे, उपाध्यक्ष डॉ. जे.जे.शहा, संचालक डॉ.संजय पुरंदरे, संचालक डॉ.गोकुळ काळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, हॉस्पिटलमध्ये दाखल होणा-या रुग्णांना वेळीच आवश्यक ते उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासोबतच सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्यासाठी असणाऱ्या शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजंनाबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत मदत पोहचण्याकरीता प्रयत्न करावेत. या मदतीमुळे सर्वसामान्य कुटुंबावरील उपचाराचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.
यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिल्या जाणा-या वैद्यकीय सुविधांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. तसेच शासनाच्या विविध वैद्यकीय योजना व सुविधाचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना देण्याकरीता विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
० ० ० ०