बोरघर दि ०६ :- बोरघर / माणगांव ,तालुक्यातील गोद आणि काळ नदीच्या पुलाच्या बांधकामात संबंधित खात्याचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करुन सदर पुलाच्या बांधकामाच्या दर्जात प्रचंड हयगय करुन आर्थिक कमिशन लाटून केलेल्या दर्जाहीन कामामुळेच काही वर्षातच या पुलांचे संरक्षक कठडे सद्या ढासळून पडू लागलेत. या बाबत सविस्तर वृत्त असे आहे,
माणगांव तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या रहदारीच्या माणगांव मोर्बा दिघी रोड दरम्यान असलेल्या गोद नदी वरील पुलाच्या संरक्षक कठड्याला तडे गेल्याने या पुलाचा संरक्षक कठडा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या महामार्गावरुन दररोज सकाळ संध्याकाळ आणि रात्री उशिरापर्यंत आंतरराष्ट्रीय दिघी बंदराकडे मालाची ने आण करण्यासाठी सतत धावणाऱ्या वाहतूकीस संभाव्य धोका निर्माण झाला आहे. तसेच दुसरीकडे माणगांव तालुक्यातील कशेणे ते कालवण गावा दरम्यान असलेल्या मुठवली या गावा जवळील नदी वरील पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे सद्या झालेल्या पावसामुळे नदीच्या पात्रात ढासळून पडलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक आणि रहदारी बंद ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे या विभागातील मुठवली, कालवण, पाणसई, दाखणे इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या विभागातील शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक यांची दैनंदिन कामकाजासाठी इंदापूर येथे शाळा कॉलेज व बाजारपेठेत आणि तालुक्याच्या ठिकाणी माणगांव येथे येण्यासाठी मोठी गैरसोय होते आहे.या दोन्ही पुलांच्या बांधकामातील संबंधित खात्याचे भ्रष्ट अधिकारी आणि स्वार्थी ठेकेदार यांच्या अक्षम्य तृटींमुळे निष्पाप विद्यार्थी आणि नागरिकांना यामुळे होणाऱ्या त्रासाला आणि संभाव्य धोक्यास या दोन्ही पुलांच्या कामातून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार करुन मालामाल होणारे संबंधित खात्याचे अधिकारी आणि ठेकेदारच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे या विभागातील नागरिकांच्या मनात एकच विचार रुंजी घालत आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकामांच्या कामात ठेकेदार आणि संबंधित खात्याचे अधिकारी होत आहेत मालामाल मात्र यामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक सोसावे लागत आहेत हालचाल हाल. त्यामुळे या गंभीर बाबींचा विचार करून संबंधित खात्याच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोरता कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे त्याच बरोबर या ठिकाणी तात्काळ ठोस उपाययोजना करुन नागरिकांची आणि वाहतूकीची गैरसोय दूर करुन या पुढे सार्वजनिक हितांच्या कोणत्याही कामात जनतेची दिशाभूल वा त्यांची फसवणूक होणार नाही या कडे लक्ष वेधून स्वच्छ कारभार करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे अशी जनतेची अपेक्षा आहे.
विश्वास गायकवाड