पुणे दि२६ : – शिवाजी रोडवरील छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ असलेल्या हनुमान मंदिराजवळ भरवस्तीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
नंदकुमार बाबुराव नाईक (वय-६२ रा. शुक्रवार पेठ), प्रमोद हिरालाल सेन (वय-४०), राजेश प्रल्हाद जाधव (वय-२७), राजधर मुरलीधर मोहिते (वय-२८ रा. बुधवार पेठ), चंद्रकांत मनोहर एकबोटे (वय-६१ रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट -३ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना शिवाजी रोडवरील मध्यवस्थीत कल्याण मटका जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार युनिट-३ च्या पथकाने याठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ६७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार आड्डा नंदकुमार नाईक चालवत होता. त्याच्यावर यापूर्वी खडक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, राजकुमार किंद्र, पोलीस कर्मचारी दिपक मते, दत्तात्रय गरुड, मच्छिंद्र वाळके, रामदास गोणते, रणजित अभंगे, रोहीदास लवांडे, संदीप राठोड, बलतु घाडगे, कल्याण ननावरे यांच्या पथकाने केली.