मुंबई, :- दि. २१ :- बाळू राऊत प्रतिनिधी, योग एक प्रकारची उर्जा आहे. नियमित योगाभ्यास केल्याने मानसिक आणि शारीरिक मजबुती बरोबरच मानवी जीवनात संस्काराची भावना निर्माण होते, बौध्दिक पातळी सुधारते आणि भावनांना स्थिर ठेवून उच्च पातळीच्या एकाग्रता मध्ये वाढ करण्यास मदत करते असे सांगून योगामुळे भारतीय संस्कृतीची जगाला ओळख झाली असल्याचे राज्याच्या ग्राम विकास, महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
दि चिल्ड्रन एड सोसायटीच्या डोंगरी उमरखाडी (मुंबई) येथील निरिक्षण गृह, बाल गृहातील मुलींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग साधना केल्यानंतर माध्यम प्रतीनिधीशीं संवाद साधतांना त्या बोलत होत्या.
मंत्री मुंडे म्हणाल्या, २१ जून रोजी जगात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनांची सुरुवात केली. योग ही भारताची हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. नित्य योग साधना केल्याने शरीर निरोगी रहाते. बाल वयापासूनच योग केल्यास त्याचा अधिक प्रमाणात लाभ मिळतो, त्यामुळे बाल गृहात येऊन बालकांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांच्या सोबत योग साधना करुन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.