पुणे, दि ३१: – जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप उपस्थितहोते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस वंदन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी प्रास्ताविक केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांनी माहिती दिली. मौखिक आरोग्य चांगले ठेवूनस्वस्थ जीवन कसे जगता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हयात एकूण १४ समुपदेशन केंद्र सुरु असून या समुपदेशन केंद्राकरीता तयार करण्यात आलेल्या समुदेशन पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील वाहक श्री लोहार यांनी तंबाखू सोडली असल्याने त्यांचे सुद्धा स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. लोहार यांनी कश्याप्रकारे तंबाखू सोडली व याकरीता दृढ निश्चय कसा आवश्यक आहे, हे मनोगतात सांगितले. त्यानंतरआमदार जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांनी तंबाखू सोडावी, ते कठीण नाही. मी सुद्धा सोडली, असे म्हणत सर्वांना तंबाखू सोडण्याकरीता आवाहन केले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी तंबाखू सोडणे गरजेचे आहे. धूम्रपानामुळे सर्वांनाच त्रास होतो, त्यामुळे असे करणाऱ्यास दंड करावा व तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीस त्याची जाणीव व्हावी याकरीता त्यांना समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमानंतर शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी एकपात्री नाटक सादर केले.