मुंबई, दि. १६ :- लोकसभा निवडणूक-2019 च्या मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने गुरुवार दि. 16 मे, 2019 रोजी गोरेगाव येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान दि. 19 मे, 2019 रोजी होत असून दि. 23 मे, 2019 रोजी देशभरात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची तयारी राज्यात सुरू आहे. त्यादृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून मतमोजणीची कार्यपद्धती,मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदींबाबत यावेळी माहिती दिली जाणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर निकाल प्रदर्शित करणे,व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांची मोजणी याबाबत अभिरुप मतमोजणीचे (मॉक काऊंटिंग) प्रत्यक्ष प्रशिक्षण (हॅण्ड्स ऑन ट्रेनिंग) यावेळी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. हे अधिकारी नंतर त्यांच्या अधिपत्याखालील मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.