पुणे दि,२७ : – पुणे भारती विद्यापीठ पोलिसांनी पुणे सातारा रस्त्यावरील त्रिमुर्ती प्राईड लॉजवर छापा टाकून आयपीएलवर बेटींग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांमध्ये काल सुरु असलेल्या मॅचवर बेटींग सुरु असताना छापा टाकून येथून २ जणांना अटक केली आहे. तर ८८ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
दिपक अशोक भोसले (वय. ३१, रा. पॅरामाउंट इरॉस, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) व अजय अनिल खेडेकर (वय. २५ सेनापती बापट रोड, गोखलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर फोनवरून सट्टा घेणाऱ्या शिंदे ( नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंत पायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्यावरील भिलारेवाड़ी येथे असलेल्या हॉटेल त्रिमुर्ती प्राईड लॉजमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये सुरु आय़पीएलच्या मॅचवर बेटींग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या लॉजवर रात्री साडेअकराच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी भोसले व खेडेकर हे दोघे तेथे सट्टा घेताना पोलिसांना मिळून आले.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. हॉटेलच्या रुम नं १०२ मधून ४ मोबाईल हॅन्डसेट, टिव्ही, सेट टॉप बॉक्स, एक वही असा ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत