पुणे, दि.२५ :- भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करुन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.पुणे जिल्हयातील मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिका-यांच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आज दोन सत्रामध्ये झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक हरी किशोर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये ज्या-ज्या अडचणी आल्या होत्या, त्याचा अभ्यास करुन याबाबत खबरदारी घेण्यात यावी, असे सांगितले. क्षेत्रीय अधिका-यांनी निवडणूक विषयी लागणारे आवश्यक साहित्य तपासून वेळेवर ताब्यात घेवून त्याचा अहवाल तात्काळ द्यावा, नियोजित वेळेतच आपापल्या मतदान केंद्रांवर पोहचावे. मतदानस्थळावर पोहोचताना काही अडचणी आल्यास तात्काळ संबधित अधिका-यांना संपर्क करावा, काही समस्या आल्यास त्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, मतदानपूर्व व प्रत्यक्ष मतदानादिवशी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मतदानयंत्राबाबत काही अडचणी उद्भवल्यास संबधित तंत्रज्ञांची मदत घ्यावी व जे अहवाल तातडीने पाठविणे आवश्यक आहेत, त्याबाबत वेळेवर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या.
मावळ लोकसभा निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग यांनी क्षेत्रीय अधिका-याला स्वत:च्या कामाची जबाबदारी सांभाळून त्यांच्या सहाय्यकांना मदत करावी लागते, असे सांगून सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी ठरवूर दिलेल्या जबाबदा-या पार पाडाव्यात, सर्व प्रकारचे अहवाल, प्रपत्रे विहीत वेळेत भरुन त्याची माहिती तात्काळ देण्यात यावी. मतदारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा प्रकारच्या सूचना करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयातील पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच अधिकारी व कर्मचा-यांनी जबाबदारीने काम केले.त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असे सांगून उर्वरित मतदासंघामध्ये असेच नियोजनबध्द काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. क्षेत्रीय अधिका-यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापरासंबंधी देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची उजळणी घेतली. निवडणूक प्रक्रिये मध्ये क्षेत्रीय अधिकारी हा महत्वाचा घटक असतो, असे प्रतिपादन करुन मॉकपोलच्या दरम्यान उद्भवणा-या तांत्रिक अडचणींबाबत चर्चा केली. मतदानकेंद्रामध्ये गर्दी होऊ देऊ नये, मतदानकेंद्रात मतदारांना मोबाईलचा वापर करु न देणे, उर्वरित कालावधीमध्ये मतदानस्लीपांचे वाटप करावे. क्षेत्रीय अधिका-यांनी अजिबात आपले लक्ष विचलीत होऊ न देता तांत्रिक बाबींसंदर्भात दिलेल्या प्रशिक्षणामधील सूचनांप्रमाणेच कार्यवाही करावी. दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी पाठवावी. क्षेत्रीय अधिका-यांना दिलेल्या जबाबदा-यांचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा प्रकारच्या सूचना केल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मतदानादिवशी मतदानकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व आस्थापना बंद राहतील याकडे क्षेत्रीय अधिका-यांनी लक्ष द्यावे, तसेच परिसरामध्ये खाजगी वाहने नेऊ देवू नये. क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात आलेल्या दंडात्मक कार्यवाहीच्या अधिकाराबाबत सजग रहावे, व काही गोंधळाची परिस्थिती आल्यास नजीकच्या पोलीस अधिका-यांशी तात्काळ संपर्क साधावा. याकरीता सर्व पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक त्यांना उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापरासंबंधीचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे समन्वय अधिकारी डॉ.ज्योत्स्ना पडियार यांनी प्रशिक्षणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले.