.पुणे, दि. १२:- ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 23 एप्रिल,2019 च्या रात्री 12 वाजेपर्यत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अनुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. या आदेशानुसार रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशाप्रकारे चालावे, त्यानी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, कोणतीही मिरवणूक कोणत्या मार्गाने,कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नये असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य निर्देश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनीक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरची वेळ, पध्दती, ध्वनी तीव्रता,आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे याचा समावेश आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33,35,37 ते 40,42,43, व 45 या अन्वये दिलेल्या
कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे याचाही समावेश आहे, ग्रामीण पोलीस अधीक्षक, पुणे यांनी कळविले आहे.
प्रतिबंधात्मक आदेश
पुणे हवेली तालुक्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आर्दश आचारसंहितेचा भंग होवून त्यास बाधा निर्माण होऊ नये यासाठी त्यास सत्वर प्रतिबंध करुन उपाययोजना करणे आवश्यक असल्याने ग्रामीण फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी हवेली, उपविभाग, पुणे यांनी हॉटेल, लॉजेस, फार्म हाऊ, बिअरबार, परमीटरुम, बिअर शॉपी, वाईन शॉप, देशी दारुचे दुकाने, पानटपरी, हातगाड्या इ. आचारसंहिता दररोज रात्रीस 10 चे पूर्वी बंद करणेसाठी आदेश निर्गमित केले आहे.