पुणे, दि, १० :- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज दौंड तालुकयाचा दौरा करुन लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस उप अधीक्षक सचिन बारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तहसिल कार्यालयात झोनल अधिका-यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी राम यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन, व्हीव्हीपॅटच्या प्रशिक्षणाबाबतची माहिती जाणून घेतली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुस्थितीत होण्यासाठी झोनल अधिका-यांचे योगदान महत्त्वाचे असून प्रत्येकाने आपल्या कामात दक्ष रहावे. यापूर्वीच्या निवडणुकांचा अनुभव असला तरी यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर असल्याने मतदान यंत्र हाताळणी करतांना खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्हाधिकारी राम यांनी या उपक्रमांतर्गत सादर झालेलया पथनाट्याची पहाणी करुन कलाकारांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी राम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसेच स्ट्रॉंग रुमची पहाणीही केली. स्थिर सर्वेक्षण पथक, आचार संहिता कक्ष आदींचीही माहिती यावेळी घेण्यात आली.