पुणे, दि. २५ : – भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना (पीपल विथ डिसअॅबिलीटी-पीडब्ल्यूडी) आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच समन्वय अधिकारी यांच्याशी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज संवाद साधला. मतदार नोंदणी मोहिम, दिव्यांग मतदार सुविधा, आचारसंहिता भंग आणि फ्लाईंग स्कॉड आदीबाबत त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हानिहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला. बैठकीत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांची माहिती, जिल्हा प्रशासनाची तयारी त्यांनी जाणून घेतली. ‘एकही मतदार सुटता कामा नये’, हे यंदाच्या निवडणुकीचे ब्रीदवाक्य असून सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्यांग मतदारांबाबत अधिक जागृत राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, वीजेची सोय, दिव्यांग मतदारांना मतदान कक्षात जातांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध राहावी, असे त्यांनी स्पष्ट केले. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट, गाईड त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच दिव्यांग मतदारांसाठी वाहतूकीची व्यवस्था करण्याबरोबच त्यांना मतदानासाठी रांगेत थांबून राहायला लागू नयेत याची काळजी घेतली जावी यांची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी भरारी पथकासह इतर पथकांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटबाबत पोलीस विभागासह सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करावी, शंकानिरसन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. सी-व्हीजील अॅपवर येणा-या तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आदेश मिळाल्यावर कार्यवाही करण्यापेक्षा सक्रिय राहून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्वच विभागांना आचार संहितेचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. आदर्श आचार संहिता देशभर लागू असून रेल्वे, डाक विभाग, कृषी, बँका यांच्यासह शासकीय- निमशासकीय संस्थांनी आचार संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. आचार संहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कार्यवाही होईल, असेही त्यांनी सांगितले.