पुणे,दि.११:- अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीच्या खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणीकंद परीसरात घडला आहे.
अनिल लालसिंग ठाकुर (वय ३०, रा. वाघमारे वस्ती, पेरणेफाटा, पेरणेगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी सुमित्रा लालसिंग ठाकूर (रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा) हिला अटक केली आहे. तर तिचा प्रियकर प्रफुल पुंडलिक ताथोड (वय ३५) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनिल याचा भाऊ सुनिल लालसिंग ठाकूर (वय ३२, रा. पेरणे फाटा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोणीकंद येथी तळेराण वस्ती येथील खडी मशीनजवळील मोकळया जागेत गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ठाकूर हा काही कामधंदा करत नसे. त्याची पत्नी सुमित्रा ठाकूर हिचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे होत असत. अनिल ठाकूर हा दारु पिऊन तळेराण वस्ती जवळील मोकळ्या जागेत पडला होता. आपल्या प्रेमात अडथळा ठरलेल्या अनिलच्या डोक्यात दोघांनी दगड घालून त्याचा खून केला. तळेराण वस्ती जवळील मोकळ्या जागेत खून झाल्याची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांच्या खबरीने सुमित्रा ठाकूर हिचे प्रफुल ताथोड याच्याबरोबर असलेल्या संबंधाची माहिती दिली. पोलिसांनी सुमित्राकडे चौकशी केल्यावर तिने आपणच प्रफुलच्या मदतीने अनिलच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून प्रफुल ताथोड याचा शोध पोलीस घेत आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे पुढील तपास करीत आहेत.