पुणे,दि.२१:- पुणे शहरातील बालेवाडी येथील विलास तात्या बालवडकर चौकातील रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर येथे दुचाकीवरुन आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने बालेवाडी येथील एका गॅरेज मध्ये दरोडा टाकला. गॅरेजमधील लोकांना हत्याराने धमकावून त्यांना मारहाण करुन लुटले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली असून ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बालेवाडी येथील विलास तात्या बालवडकर चौकात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली
अलीम सय्यद (वय १९), देवा शिरोळे (वय २०) आणि मोहन अडागळे (वय १९) यांना अटक केली असून अन्य ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सिद्धेश्वर दिगंबर ढेरे (वय ३४, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ९ ते १० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर हे गॅरेज आहे. ते गॅरेजमध्ये असताना तीन वेगवेगळ्या दुचाकीवर चेहरा झाकलेले ९ ते १० जण गॅरेजमध्ये शिरले. त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी हत्याराने व लाकडी काठ्यांनी फिर्यादी व गॅरेजमधील इतर लोकांना धमकावले. तसेच मॅकेनिक व गिर्हाईक यांना त्यांच्याकडील हत्याराने मारुन जखमी केले. गॅरेज कामाची मिळालेली रक्कम व इतर लोकांची मिळून रोख ४९ हजार रुपये तसेच फिर्यादी यांचा मोबाईल असा ६९ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हत्याराचा धाक दाखवून काढून पळून गेले.
दरोड्याच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली
फिर्यादीकडून मिळालेले वर्णन आणि तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आरोपी पिंपळे गुरव, सांगवी येथे असल्याच्या माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, विजयानंद पाटील , सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले , हवालदार वाघवले, मोमीन, दुशिंग, तांदळे, दांगडे, माने, शिर्के, दुर्गे, पोलीस अंमलदार खरात, भांगले, तरंगे यांनी केली आहे.