पुणे दि, ११ : – लोकसभा निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी ५ हजार ६१६ गुन्हेगार आणि लोकांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. तर निवडणूकीची तयारी पुर्ण झाली असून ४० हजार कर्मचारी यासाठी लागणार आहेत. त्यांना नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशी माहिती पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. यावेळी पोलीस अधिक्षक संदिप पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईसंदर्भात सहा प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. तर १११ जणांचा तडीपारी प्रस्ताव असून ५६ जणांना तडीपार करण्यात आले आहे. तर ३१ जणांवर एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव आहे. त्यातील ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात शेतकऱ्याना दुष्काळ निधी वाटप करण्यासंबंधी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका आणि ग्रामपंचायत यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. यासंदर्बात तक्रार असल्यास सिव्हिजिल मोबाईल अपद्वारे तक्रार करता येणार आहे. ९० मिनिटात तक्रार कारवाई योग्य आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे. तर निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभने दाखविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ६३ भरारी पथके आणि ४१ चेकपोस्ट तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये महसूल व पोलीस अधिकारी असतील.
आर्थिक व्यवहारांवर लक्ष
निवडणूक काळात मोठ्या रकमांची अफरातफर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयकर विभाग आणि बँकेतील अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. दहा लाखांपर्यंत रक्कम खात्यात जमा झाल्यावर त्याचा स्त्रोत तपासला जाणार आहे. त्यामुळे बँक खात्यांतील आर्थिक व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
सोशल मिडीयावर करडी नजर
उमेदवारांच्या सोशल मिडीयावर असणाऱ्या खात्यांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहेत. त्यावरून होणाऱ्या प्रचाराची नोंद उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सामील केला जाणार आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.