पुणे,दि.०९:- पुण्यात कामा निमित्त आलेल्या केरळीयन तरुणाची रास्ता पेठेत उतरल्यावर रिक्षात बॅग विसरली होती. समर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचालकाकडून ही बॅग परत मिळवून दिली.
रियाज अहमद के पी (वय ४८, रा. कोझीकोड, केरळ) रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुणे रेल्वे स्टेशनला आले. त्यांनी रास्ता पेठेतील त्यांचे मित्र उमर करीम फारुख (वय २४) यांना भेटण्यासाठी रास्ता पेठेत आले. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने त्यांना आपली बॅग रिक्षामध्येच विसरली असल्याचे लक्षात आले. बॅगेमध्ये कपडे, मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे होती.
तक्रार देण्यासाठी ते समर्थ पोलीस ठाण्यात आले. त्यांची तक्रारार घेतल्यानंतर तपास पथकाचे पोलीस अंमलदार घोरपडे, हवालदार इमरान शेख यांनी त्या परिसरातील ६ ते ७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या रियाज हे ज्या रिक्षातून आले होते. त्या रिक्षाचा क्रमांक मिळविला. त्यावरुन रिक्षाचालक अरुण पवार (वय ५०, रा़ मानस लेक, सिटी ग्रँड टॉवर) यांच्याशी संपर्क साधला. रिक्षाचालकाने तातडीने रिक्षात विसरलेली बॅग परत आणून दिली. बॅगेतील सर्व वस्तू सुस्थितीमध्ये मिळाल्याने रियाज अहमद यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले.