पुण्यातील ‘पोलिसनामा’ या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले. पावणेदोन महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (lungs), यकृत (liver), व एक मूत्रपिंड (kidney) व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले.या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आले. त्यामुळे प्रसादने मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे.
प्रसाद गोसावी वर उपचार सुरु असतानाच
डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण प्रसादच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले. या बातमीमुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, वकृत्व एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले.
प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यावेळी डी वाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व व कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज प्रसाद या जगात नसला तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुप्फुसे व किडनी मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळणार आहे. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील.