पुणे,दि.२५:- पुणे शहरात व जिल्ह्याला मुसळधार पाऊस पुणे परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मुसळधार पाऊस सुरु असताना पुण्यातील भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी परिसरात घडली आहे.
पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. पुण्यातील रस्त्यावरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. या पाण्यात अनेक लोक अडकलेले आहेत. त्यातच आता पुलाची वाडी परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे.
रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत.
तसेच पुण्यातील वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत गोठ्यात जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस जोरदार सुरू झाला आणि नदीपात्रातील पाणी वाढले. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला व. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत.. यात 11 गाई आहेत.. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने काही जनावरे बचावली आहेत..